Sunday, 23 March 2014

तुम्ही फक्त डाउनपेमेंट भरा; कारचा 'ईएमआय' जाहिरात कंपन्या भरणार!

अनोखा फंडा / दिवसभरात 50 किलोमीटर ठरवून दिलेल्या मार्गाची सक्ती; कारवर लागणार जाहिरातीचे व्हिनाईल व्रॅप पोस्टर 


तुम्हाला कार घ्यायचीय पण पैशांची जुळवाजुळव होत नाहीये? तर मग आता चिंताच नको. तुम्ही फक्त डाउनपेमेंट भरा आणि कारचा 'ईएमआय' जाहिरात कंपन्या भरतील! आहे की नाही भन्नाट आयडीया? तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित पण मार्केटिंगच्या आजच्या युगात हा अनोखा फंडा कार उत्पादक कंपन्या व जाहिरात कंपन्यांनी व्यवहारात राबवायला सुरुवात केली आहे.

गेल्या काही वर्षात कार विक्रीचा तुलनात्मक आलेख सातत्याने खालावत चालला आहे. 'वाय ऑन वाय' म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षातील विक्री मंदावल्याने कार कंपन्यांनी जाहिरात कंपन्यांच्या मदतीने ही "ईएमआय फ्री कार'ची भन्नाट शक्कल लढविली आहे.

बीटल आणि वोक्सवॅगन या कार कंपन्यांनी सत्तरच्या दशकातच कारवरील जाहिरात फलकाची शक्कल लढविली होती. आपल्याकडेही आपण कारच्या पाठीमागील काचेवर जाहिराती पाहतो. जगभरात गेली काही वर्षे वापरात असलेली ही कल्पना भारतात सुरू होताच तिला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. सचिन रस्तोगी या पंचविशीतील तरुणाच्या खटाटोपाची माहिती  www.EMIfreecar.com या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल.

अतिशय पातळ आणि टिकावू अशा व्हिनाईलने प्रिंटींग उद्योगाचा चेहरामोहरा बदलून अनेक बाबी सोप्या केल्या. त्यामुळेच कारवरील जाहिराती अधिक आकर्षक  आणि उठावदार होतात. मुंबईसह देशातील सर्व मेट्रो शहरात काही प्रमाणात प्रमाणित कॅबवर दरवाजा व काही भागात जाहिराती दिसतात. 'नमो' कारने संपूर्ण कारच कशी जाहिरातींनी सजविता येईल, त्याचा मार्ग दाखाविला. मात्र, आता या 'कार व्रॅप'मुळे अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न सोपे होणार आहे.

काय आहेत यासाठी अटी
ठराविक मार्गावर महिन्याला 1500 किलोमीटर जावे लागेल.
कारच्या भ्रमणावर लक्ष व नियंत्रणासाठी जीपीएस बसविणार.
जीपीएस युनिट बसविण्याचा खर्च कारमालकाला द्यावा लागेल.
जाहिरात प्रिंटींग, पेस्टिंगचा खर्चाचाही भुर्दंड ग्राहकाच्याच माथी.
करारासाठी सिक्युरिटी अनामत रक्कम जमा करावी लागणार.

कार आहे? तरीही लाभ  
तुमच्याकडे अगोदरच कार असेल तरीही तुम्ही या लाभासाठी पात्र ठरू शकता. मात्र कार एक वर्षापेक्षा जुनी असायला नको.

काय आहे व्यावसायिक गणित?
पूर्वनियोजित मार्गावर धावणारी कार एखाद्या उत्पादनाला अधिक व्ह्यूअर्स मिळवून देते. शिवाय ही जाहिरात मनावर ठसते. कारमधील ग्राहकही शेजारील अशा 'जाहिरात कार'कडे कुतूहलाने बघतात. त्यामुळे ब्रॅन्ड क्युरिऑसिटीचे फलित साध्य होते.


"कार फायनान्सिंगची ही योजना खूपच छान आहे. कारविक्री हे असे क्षेत्र आहे जिथे नित्य नवे-नवे फंडे अजमावून ग्राहकाला खेचून आणणे भाग आहे."

- विष्णू माथुर, संचालक, सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग (सिआम)



No comments:

Post a Comment

Your comment is submitted! Thanks for your Feedback.