Friday, 21 March 2014

'शेंडीवाले' 'मामा' : 'दिव्य' ती पत्रकारिता!


नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा (NRMU) हा आज दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनलवर सुरू असलेला कार्यक्रम पाहा. बातमीचा 'फर्स्ट सोर्स' म्हणून लोकांना आता वृत्तपत्रे किंवा पत्रकार हे प्रथम प्राधान्य असण्याची गरज उरलेली नाही, हे मी कालच लिहिले होते. कालच्या टिटवळा लोकल अपघातातील रेल्वे मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम होता. रेल्वे प्रशासनालाही लोको मेन्सनी व गार्डसनी धारेवर धरले. युनियनचे तिघे जण स्मार्टफोन्सवर फ़ोटो घेत होते, लाईव्ह रेकॉर्ड करीत होते. त्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना बोलावले नव्हते. वाहिन्यांना, वृत्तपत्रांना तेच व्हीडीओ, फ़ोटो व प्रेस नोट्स पाठविणार होते. त्यांच्याकडे ते बीट सांभाळीत असलेल्यांची लिस्ट म्हणजे ई-मेल आयडी व मोबाईल नंबर, सोशल कॉण्टक्ट होते. बस काही क्लिक्सचे काम! किती सोपे झालेय सारे. वृत्तपत्रांना फ़ोटो लागतात तीन, पाच पिक्झलचे पुरेसे ठरतात. आता स्मार्टफोन्समध्ये आठ, बारा व त्याहीपेक्षा जास्त पिक्झल्सचे कॅमेरे असतात. एचडी रेकॉर्ड होते. त्या फ़ाईल्सची साइजही किती कमी असते. वृत्तपत्रे आपल्या लेखी बातमीच्या जोडीला डिजिटल कंटेंट वेबसाइटसवर टाकू शकतात तेही फुल, अनएडिटेड. वाहिन्या थेट व्हीडीओ  दाखवू शकतात. 


आता या कार्यक्रमस्थळीचा संघटनेचा फलक बघा. पूर्वी त्यावर वृत्तपत्रातील फ़ोटो, कात्रणे चिटकवली जायची. आता त्यांनी स्वत:च सोशल मीडियातून आलेले फ़ोटो प्रिंट करून एक सलग मोठे शीट चिकटवले. म्हणजे वृत्तपत्रांचा आधार  घेण्याची सोसायटीची गरज संपलीय. जर आम्ही त्यांची बातमी वापरू, फ़ोटो वापरू; इतरांची पत्रके वापरतो तर मग सोशल मिडीया या स्त्रोतातून येणारे कंटेंट खातरजमा करून का नाही वापरू शकत? आम्ही सोशल जर्नालिस्टना उत्तेजन का नाही देवू शकत? 

कालच्या लेखाला पूरक  घटना म्हणून हा स्फ़ुटप्रपंच!

इंटरनेटने ज्या वेगाने माहितीचा प्रचार-प्रसार घडविला, त्याच्या शतपटीने स्मार्टफोन्स बातम्यांचा स्फोट घडवताहेत. सोशल मीडियाच्या माहितीवर विश्वास कसा ठेवायचा, हे मला अनेकांनी विचारले, पण युरोप, अमेरिका, ब्रिटनमध्ये सोशल मीडिया तसेच अन्य स्त्रोतातून येणारया माहितीची खातरजमा करण्यासाठी, फॅक्ट चेकिंगसाठी स्वतंत्र डेस्क, विभाग असतो. आपल्याकडील माध्यमे का नाही हे करत?

फसवायचेच असेल तर अधिकृत वार्ताहरही शेंडी लावू शकतो. कसे ते खाली विस्तृत एका घटनेवरून विषद केलेय. मात्र, त्यात जळगावचे स्थानिक संदर्भ आहेत. मुंबई/जळगावबाहेरील मंडळींसाठी ही पोस्ट तशी इथे संपतेय.
__________________________________

जीके, कॉमन सेन्सचा वापर केला नाही किंवा खान्देशाबाहेरचा महाराष्ट्र, तिथलं राजकारण-समाजकारण किंवा लोकजीवनाचा पुरेसा अभ्यास नसला की बघा कसा घोळ होतो, फील्डवाले डेस्कवाल्यांना कशी शेंडी लावतात, ते पाहा -

जळगाव 'दिव्य मराठी'त असाच प्रकार घडला होता. एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणच्या अधिकृत वार्ताहराने गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा म्हणून विखरण गावातील एका विहीरीभोवती अख्खा गाव जमा झाल्याचे छायाचित्र पाठविले होते. उत्तम छायाचित्र म्हणून ब्युरो चीफ सुरेश उज्जैनवाल यांनी वार्ताहराचे कोण काैतुक केले. कोणीतरी दीपक पटवे नावाच्या निवासी संपादकाने तर स्टाफवरील छायाचित्रकारांची शाळा भरवून फोटो असे काढावेत, असा धडा दिला. वार्ताहर, उपसंपादकांचेही प्रबोधन केले. फोटो आठ कॉलमात, 'भास्कर'स्टाइल, अंगावर येणारा छापा म्हणू लागले. जिल्ह्यातील इतक्या भीषण पाणीटंचाइचे वास्तव तितकेच दाहक उतरावे, अशी भूमिका मांडतांना पुन्हा सर्वांचा क्लास झाला. स्कॅनिंग/प्रोसेस डिपा्र्टमेंट तीन कॉलमच्या वर करून द्यायला तयार नव्हते. दोन तास वरपर्यंत कम्युनिकेशनचा राडा सुरू होता. मी या सर्व नाट्यात बाहेर होतो. त्या दिवशी प्रोसेसने तो फोटो आठ कॉलमात करून न दिल्याने व संपादकीय वरिष्ठांनी उद्या बघू; नंतर लावू म्हटल्याने फोटो पेंडिंग राहिला. दुसरया दिवशी मी कार्यालयात येताच सेंट्रल चीफ सब जितेंद्र झंवर यांनी 'फोटो रामायणा'ची कल्पना दिली.

मी तो फोटो पाहिला आणि लगेच; लगेच क्षणार्धात मला शंका आली. विखरणमध्ये, जळगाव जिल्ह्यात असे चित्र दिसूच शकत नाही; कारण इथले लोकजीवन वेगळे आहे. जळगावात विखरणमध्ये असे आदिवासी कुठले आलेत? सारे चित्र ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी, शहापूर-कसारा  या आदिवासी पट्ट्याशी मिळते-जुळते होते. शिवाय ठाण्यातील शिवसेनेचे दाढी आमदार एकनाथ शिंदे पाठमोरे स्पष्टपणे जाणवत होते. आणखी बारकाईने पाहिले आणि युवासेनेचे युवराज आदित्य ठाकरे हेही दिसले. ठीक आहे की आमचे जळगावातील डेस्कवाले एकनाथ शिंदेंना ओळखत नसतील; पण ज्या फ़ोटोवर दोन तास खल झाला; ज्याला मैग्नीफाय करून वारंवार, वेगवेगळ्या कोनातून पाहिले गेले; त्यातले आदित्य ठाकरे दिसू नयेत; ओळखू येवू नयेत? हा म्हणजे माझ्या इतक्या वर्षातील पत्रकारितेतील एक  'दिव्य' अनुभव ठरला. ठाणे जिल्हा नसेल  पाहिला कुणी; पण आपल्या स्वत:च्या जिल्ह्याशी विसंगत लोकजीवन ओळखू येवू नये? 

प्रोसेसवाल्यांनी तो फ़ोटो कमी रिझोल्यूशनचा असल्याने आठ कॉलम करून दिला नाही; कारण तो नेटवरून डाउनलोड केलेला छोट्या साइजचा, कमी बाइटसचा फ़ोटो होता. 'दिव्य' वाल्यांनी प्रोसेस विभाग/स्कैनिंगवाले  औरंगाबादेतील शिवराज की शिवशंकर यांचा जाहीर सत्कार करायला हवा. कारण त्यांच्या ठाम भूमिका आणि नकारामुळेच एक मोठे ब्लंडर टळले. अन्यथा मुंबईच्या वर्तमानपत्रानी दोन वर्षापूर्वी पहिल्या पानावर छापलेले आदित्य ठाकरे यांचे ठाण्याच्या दुष्काळी भागातील दौऱ्याचे छायाचित्र 'दिव्य'च्या पहिल्या मेन पानावर आठ कॉलमात प्रसिद्ध झाले असते. किती इज्जत गेली असती; किती कचरा आणि छी-थू झाली असती! हा फ़ोटो घेवून नाचत सुटलेले आठ कॉलम-आठ कॉलमवाले यांचाही 'दिव्य'ने 'दिव्य' व 'अतिभव्य' सत्कार करावा! धन्य ते साहेब आणि धन्य ते 'दिव्य'!!

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भाग पिण्याच्या पाण्यासाठी हवालदिल झाला असल्याचे धरण उशाशी असूनही दोन घोट पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे  "ढेंगरमाळ' गावाचे हे छायाचित्र ११ मे  २०१२ रोजी  "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेले होते. 'सामना' व इतर सर्वांनीही छापले होते. हे सारे कन्फर्म करताना किती 'दिव्य' पार करावे लागले,मुंबई-ठाण्यातील पत्रकार, 'सामना'ची मदत झाली. पुस्तक होईल या प्रकरणावर एक; तेही दर्जेदार! तर ही होती शेंडी कशी लावली जाते, शेंडी कुणाला लागू शकते, शेंडी लावू शकली जाते असे 'शेंडीवाले' 'मामा'च कसे पुन्हा मोठेपणाचा आव आणतात त्याची सुरस, रम्य कथा!

'दिव्य'त्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती ही म्हण किती सार्थ आहे  नाही; ते  आज कळतेय. 'दिव्य' वार्ताहर, 'दिव्य' पत्रकार, 'दिव्य' डेस्क, 'दिव्य' वरिष्ठ, 'दिव्य' अतिवरिष्ठ अशी सर्वच यंत्रणा अति भव्य दिव्य; पण . . . 

'दिव्य' ती पत्रकारिता!

ही ''साठा उत्तराची कहाणी'' सुफळ संपूर्ण 

 
++++++++++++++++++



No comments:

Post a Comment

Your comment is submitted! Thanks for your Feedback.