Wednesday, 26 March 2014

नवी पुस्तके विकत घ्या 'रद्दी'च्या भावाने !

नवी पुस्तके विकत घ्या चक्क 'रद्दी'च्या भावाने किलोवर! 

किलोवर फक्त किराणामाल,फळेच उपलब्ध होतात, अशी तुमची समजूत असेल, तर मुंबईत चर्चगेट स्टेशनजवळील सुंदरबाई हॉलंमध्ये सुरू झालेल्या पुस्तक प्रदर्शनात फेरफटका मारा.तिथे चक्क पुस्तके किलोच्या दराने मिळतील! मुलांची पुस्तके तसेच डिक्शनरीज व आर्ट बुक्स १५० रुपये किलो तर इतर पुस्तके १०० रुपये किलो'  दिलखुलास मामला!  



कशी वाटतेय कल्पना? काही शहरांमध्ये कपडे किलोवर विकले जातात, पण पुस्तके किलोवर विकण्याची कल्पना वाचकांसाठी अगदीच नवीन आहे. जी पुस्तके आपण प्राणापलीकडे सांभाळून ठेवतो, जतन करतो, त्या प्रत्येकामागे आठवणींचा हिंदोळा असतो अशी जुनी-नवी पुस्तके आता  खुल्या बाजारात चक्क किलोने विकली जाताहेत! हे खरे म्हणजे आपल्या भावनांवर किती मोठा आघात केल्यासारखे आहे. नवी पुस्तकेही किलोवर घ्यायची? पण, आता व्यवहार तो व्यवहार! 

मुंबईच्या बटरफ्लाय बुक्‍सने हे प्रदर्शन आयोजिले आहे.


लहान मुलांच्या पुस्तकापासून संगणक, कथा-कादंबऱ्या, आत्मचरित्रे, बागकाम, स्वयंपाक, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे भाग अशी विविध प्रकारची पुस्तके प्रदर्शनात आहेत. विशेषतः लहान मुलांच्या पुस्तकांत खूपच वैविध्य आढळते. भरपूर चित्रे, डोळ्यांना चांगली वाटेल अशी रंगसंगती, काही पुस्तकात कागद ओढल्यावर अचानक ससा किंवा इतर पात्रे बाहेर येण्याची क्‍लृप्ती, बॅटरीवर चालणारा खेळ पुस्तकातून खेळण्यातील आनंद देणारी पुस्तके येथे आहेत. 

बालगोपाळांसाठीचे कार्टून, अभिजात कादंबऱ्या, उच्च तंत्रशिक्षणाची क्रमिक संदर्भपुस्तके, शेअरमार्केटपासून व्यवसायोपयोगी, आरोग्यदायी टिप्स देणारी गाईड्स अशा अनेकविध पुस्तकांचे दालन या प्रदर्शनाच्या माध्यमातून खुले झाले आहे. एरवी, हजारो रुपयांना मिळणारी पुस्तके सवलतीच्या दरात मिळत आहेतच,शिवाय किलोच्या भावानेही पुस्तके मिळत असल्याने वाचनप्रेमींच्या त्यावर उड्या पडत आहेत. सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत सहा एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. 

संदर्भ म्हणून अनेकदा जुनी पुस्तके वापरावी लागतात. अशा प्रदर्शनात ती स्वस्तात मिळतात. तसेच, प्रोजेक्टसाठी उपयुक्त जुन्या गाड्या मशीन्सची पुस्तके या प्रदर्शनात मिळतात, म्हणून ती विद्यार्थ्यासाठी पर्वणीच ठरतात. बड्या दुकानांमध्ये पुस्तकांवर जास्त सवलत नसते. एका किलोत हवी असणारी पुस्तके मिळतात. किलोपेक्षा जास्त भरली तरी पुस्तकांच्या मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्त असल्याने फायदा होतो.

आवाक्याबाहेरील किमतीमुळे वाचकांना अनेकदा ते खरेदी करण्याच्या मोहाला आवर घालावा लागतो. किलोच्या दारात उपलब्ध करून दिल्याने पुस्तकांच्या किमतीचा प्रश्नच येत नाही. वाचक पुस्तकखरेदीचा मनमुराद आनंद घेऊ शकतो, अशा शब्दांत प्रदर्शनाचे आयोजक अजय गुप्ता यांनी 'किलो'चा फंडा कथन केला. 

आयोजक माधवी सोनावाला म्हणाल्या, "आमच्या ग्रुपमधील अजय गुप्ता यांना ही कल्पना सुचली आणि गेल्या वर्षापासून आम्ही अशी प्रदर्शने भरविण्यास सुरवात केली. यात आमचा फार फायदा होतो असे नाही, पण आम्हाला हे करायचे आहे. पुणे,बंगळूरला झालेल्या प्रदर्शनातही वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आम्ही इंग्लंडमधून मोठ्या प्रमाणात पुस्तके घेतो. तिथल्या वाचनालय, काही ठराविक दुकानांतून ही खरेदी करतो. मोठ्या प्रमाणात पुस्तके घेतल्याने आम्हालाही परवडते. सतत नवीन स्टॉक येत असतो.'' 

कॉपीराइट संपलेल्या पुस्तकांची कोल्हापूरच्या 'अजब प्रकाशन'ने कोणतेही पुस्तक ५० रुपयात ही क्रांतीकारी योजना राबवून अख्ख्या महाराष्ट्रात धमाल उडवून दिली. सरत्या आर्थिक वर्षात जितकी पुस्तके राज्यातील सर्व नामवंत प्रकाशकांनी मिळून विकली नसतील त्याहीपेक्षा अधिक एकट्या 'अजब'ने विकली असतील!  त्यानंतर आता पुस्तके खपविण्याची ही 'बुक बाय वेट' अशी भन्नाट कल्पना आलीय. आजपर्यंत रद्दीवाला आपल्याकडची जुनी पुस्तके  विकत घ्यायचा. 

मराठी पुस्तकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न

आजकाल किलोवर पुस्तके, पन्नास रुपयांत पुस्तके व ज्याप्रमाणे इतर क्षेत्रात एका वस्तूवर एक वस्तू फ्री त्याप्रमाणेच पुस्तक क्षेत्रातसुद्धा एका पुस्तकावर एक पुस्तक फ्री अशा अनेक प्रथा बोकाळल्या आहेत. ५० रुपयांत ज्या प्रकाशकाने पुस्तके काढली आहेत व विक्रीचे उच्चांक गाठले हे जरी खरे असले तरी प्रत्येक प्रकाशकाला प्रत्येक पुस्तक ५० रुपयांत देणे हे नजीकच्या काळात तरी शक्य होईल असे वाटत नाही. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे उत्पादन जास्त केले की, किंमत आपोआपच कमी ठेवणे शक्य होते. लेखक व त्यांचे वारसदार टप्प्याटप्प्याने मानधनाची रक्कम घेत बसण्यापेक्षा एकदम काहीतरी आकर्षक रक्कम त्यांना कोणी जर देऊ केली तर ते कायमचे हक्क एखाद्या प्रकाशकाला देतात. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या अशा पुस्तकांच्या आवृत्त्या निघू शकतात. त्यामुळे या कमी किमतीत पुस्तके अगर तत्सम प्रकारे पुस्तके विकली जातात. मात्र अशा पुस्तकांचा छपाईचा दर्जा, कागदाचा दर्जा, पुस्तकाचे शुद्धलेखन या बाबींकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारची पुस्तके विक्री करणे प्रत्येक प्रकाशकाला शक्य होणार नाही. ही काही कायमस्वरूपी चालणारी पद्धत होऊ शकेल असे आता तरी वाटत नाही. 

आपल्या मराठी पुस्तकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर काही चांगल्या परंपरा आहेत, प्रतिष्ठा आहेत. रस्त्यावर मराठी पुस्तके फेरीवाल्यांप्रमाणे विकली जाऊ नयेत किंवा हिंदी पुस्तकांच्या २५ हजार, ५० हजार, लाख अशाप्रमाणे त्यांच्या एकेका पुस्तकाची आवृत्ती असते. त्याचे उत्पादन कसे असते हे आपण पाहतोच. तरीसुद्धा अशी पुस्तकेही खूप विकली जातात. त्यांचासुद्धा दर्जा तेवढा चांगला नसतो, परंतु मराठी वाचकांना, प्रकाशकांना व लेखकाला दर्जेदार प्रकारची निर्मिती आवडते. त्यामुळे पुस्तकांची विक्री करून आपल्या काही चांगल्या परंपरा, प्रथा, प्रतिष्ठा सांभाळल्या जाणार नाहीत. हे जरी खरे असले तरी काही ग्राहक अशा प्रकारच्या विक्रीकडे आकर्षिले जात आहेत, हे मान्य करायला हवेच.

पुस्तके स्वस्त मिळविण्यासाठी काही चांगले उपाय जरूर आहेत. पुस्तक छपाईला लागणारा कागद ज्याप्रमाणे वृत्तपत्रांना स्वस्त दराने दिला जातो. त्याप्रमाणे पुस्तक निर्मितीलासुद्धा दिला जावा. ऑक्ट्राय, व्हॅट इत्यादी करांतून पुस्तकांशी संबंधित असलेल्या व्यवसायांना वगळावे. वित्तसंस्थांनी अत्यंत कमी दरात व्याज आकारून अर्थपुरवठा करावा. प्रकाशकांच्या सोसायट्या असाव्यात आणि शासन व प्रकाशन संस्थानी एकत्रित साहित्याचा प्रचार आणि प्रसार होईल अशी कामे करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रकाशन व्यवसायाला अधिकाधिक चांगले दिवस येण्यास वेळ लागणार नाही. त्याप्रमाणे विक्रीचीसुद्धा काही नवीन तंत्रज्ञाने अवगत करायला हवीत. ती अशी की, ई-बुक, सर्क्युलेशन लायब्ररीज, पुस्तकांची होम डिलिव्हरी, स्वत:ची वेबसाईट, एक्झिबिशन व अन्य बदलांचा अवलंब करणे ही काळाची नितांत गरज आहे.

- शरद मराठे
(लेखकाला सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार यंदा मिळाला असून ते नवचैतन्य प्रकाशनचे प्रमुख आहेत.)

No comments:

Post a Comment

Your comment is submitted! Thanks for your Feedback.